Place: यवतमाळ | Date: 2026-10-24

महाविद्यालयीन परिसरात सर्वसमावेशक वातावरण निर्मिती आणि विद्यार्थिनींमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने विद्या प्रसारक मंडळ संचालित येथील अमोलकचंद महाविद्यालयाच्या वसंतराव नाईक सभागृहात महिला कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने आयोजित सत्रातून विद्यार्थिनींना व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन, कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करण्याचे मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजय लाड होते. महिला कक्षाच्या संयोजिका तथा महिला तक्रार निवारण समन्वयक डॉ. सुनीता गुप्ता, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. माधुरी भाडे, डॉ. अश्विनी जयस्वाल आणि प्रमुख मार्गदर्शक उद्योजक, गुंतवणूकदार आणि विकास धोरणतज्ज्ञ मितुल शिंगाडिया (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती. हू टू वॉव या विषयावर मार्गदर्शन करताना मितुल शिंगाडिया यांनी आपल्या २० वर्षांच्या व्यावसायिक अनुभवातील विविध उदाहरणे, प्रकरणांचा अभ्यास आणि व्यावसाि परिवर्तनाची सूत्रे विद्यार्थ्यांसमोर मांडली. आधुनिक उद्योग उभारणीचा प्रवास उलगडून सांगताना त्यांनी विद्यार्थिनींना 'मी कोण आहे?' या प्रश्नात अडकून न राहता स्वतःची कौशल्ये, क्षमता आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द विकसित करण्याचे आवाहन केले. खुल्या चर्चासत्रात विद्यार्थिनींनी मितुल शिंगाडिया यांच्याशी थेट संवाद साधत विविध प्रश्न उपस्थित केले. या संवादामुळे विद्यार्थिनींना त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्याची आणि व्यावसायिक क्षेत्रातील आव्हानांविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली.यावेळी समयोचित विचार मांडले. डॉ. प्रिया तुमराम यांनी सूत्रसंचालन केले. समारोपप्रसंगी डॉ. रूपेश मडेलवार यांनी आभार मानले. आगामी शैक्षणिक सत्रात या कक्षाच्या माध्यमातून विविध विकासात्मक कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे आणि सहाय्यकारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.