News-Details

इंग्रजी भाषेच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधींचे विस्तृत दालन :डॉ. अजय लाड

Place: यवतमाळ | Date: 2026-10-02


यवतमाळ विद्या प्रसारक मंडळाद्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ येथील इंग्रजी (पदवी व पदव्युत्तर पदवी) विभागाच्या वतीने इंग्रजी लिटररी क्लब याअभ्यास मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची आवड निर्माण करणे, साहित्याची अभिरुची विकसित करणे तसेच इंग्रजी विषयाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधींची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड होते, तर प्रा. डॉ. मनोज भगत हे कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश खंडेराव यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते प्रा. डॉ. मनोज भगत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून इंग्रजी भाषेचे आजच्या युगातील महत्त्व अधोरेखित केले. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संशोधन, अध्यापन, अनुवाद, पत्रकारिता, माहिती-तंत्रज्ञान तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये इंग्रजीच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा केवळ अभ्यासक्रमापुरता विचार न करता तिचा प्रभावी संवादासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अजय लाड यांनी इंग्रजी भाषेची सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील गरज स्पष्ट केली. सार्वजनिक जीवनात प्रभावी संवाद साधण्यासाठी तसेच आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या विविध क्षेत्रांशी जोडले जाण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी भाषेचे अधिकाधिक ज्ञान आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश खंडेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इंग्रजी लिटररी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि भाषिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या वाचन, लेखन, वक्तृत्व आणि सादरीकरणाच्या कौशल्यांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अभ्यासपूरक उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. डॉ. गणेश खंडेराव लिखित "Manncynnes The Heart of Heorte Humanity" या काव्य पुस्तकाचे विमोचन करण्यात आले, या प्रसंगी प्राचार्य डॉ. अजय लाड, डॉ. जाधव, डॉ. मेटे, प्रा. वानखेडे, डॉ. भगत, डॉ. बुटले, प्रा. तायडे, प्रा. राठोड, प्रा. धारणे, आणि प्रा. ठाकरे हे उपस्थित होते. सोबतच या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्याथ्र्यांमध्ये इंग्रजी भाषा व साहित्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी इंग्रजी लिटररी क्लब महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. संचालन प्रा. अभिरुची सेजोडे यांनी केले तर आभार प्राध्यापक सार्थक ठाकरे यांनी मानले.