Place: यवतमाळ | Date: 2026-09-13

अमोलकचंद महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या नूतनीकृत अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात झाले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रयोगातून वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्य आणि संशोधनवृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने प्रयोगशाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे.विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी राज्यसभा सदस्य तथा लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव सी. ए. श्री. प्रकाशजी चोपडा होते. यावेळी सेवानिवृत्त प्रा. ए. एस. अट्रावलकर, प्रा. सी. बी. देशपांडे, प्रा. एस. एस. काबरा, डॉ. जी. बी. पाचाडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. लाड व विभागप्रमुख प्रा. डॉ. टी. पी. चव्हाण उपस्थित होते. प्रा. डॉ. चव्हाण यांनी प्रयोगशाळेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट केले.आधुनिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उपयोग करून प्रयोगशीलता व संशोधनाची आवड जोपासावी, असे आवाहन सी.ए. प्रकाशजी चोपडा यांनी केले.. यावेळी 'कॅबिनेट ऑफ इलेक्ट्रोड फॉर इलेक्ट्रोकेमिकल अनालिसिस' या विषयावरील पेटंट मिळविणाऱ्या आचल पवार, वैभवी गोंडे व तेजस बेले यांचा गौरव करण्यात आला. प्रयोगशाळेच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतल्याबद्दल प्रा. डॉ. प्रशांत मुस्कावार यांचाही सत्कार झाला. संचालन प्रा. वाय. व्ही. खंदारे यांनी केले.